भटक्‍या-विमुक्तांच्या मागण्यांसाठी भाजपाचा पंचवटीत रास्ता रोको.
लोकमत २८-११-२००६
  सर्वांगीण विकासापासून वंचित असलेल्या भटक्‍या-विमुक्त जमातीच्या विविध मागण्या मान्य कराव्यात, यासाठी आज सकाळी पंचवटीकारंजा येथे भारतीय जनता पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

शासनाच्या विरोधात आंदोलन छेडनार्‍या सुमारे १२७ आंदोलनकर्त्यांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून अटक केली व नंतर सुटका केली.

देशभरात भटक्‍या-विमुक्त समाजाची संख्या १५ कोटी असून हा समाज शासकीय सवलतीपासून वंचित आहे. या समाजाच्या मागण्या शासनाने मान्य कराव्या म्हणून आज भाजपा नेते गणेश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.

दि. २७ नोव्हेंबर २००६ रोजी सकाळी १० वाजता पंचवटीकारंजा येथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भटक्‍या विमुक्त जमातीचे नागरिक एकत्र आले. कारंजावर सभा झाली. या सभेत सरचिटणीस गोपाळ पाटील, शहराध्यक्ष विजय साने यांची भाषणे झाली.

या रास्ता रोको आंदोलनादरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणा करून भटक्‍या-विमुक्त जमातीला क्रिमिलियरमधून वगळण्यात यावे, भटक्‍या-विमुक्त समाजासाठी राज्यभर आश्रमशालांची स्थापना करावी, भटक्‍या-विमुक्त समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय व निधी उपलब्ध करावा. समाजातील विद्यार्थ्यांना शासनातर्फे शिष्यवृत्ती देण्यात यावी व वसंतराव नाईक महामंडळास प्रतिवार्षी ३०० कोटी रुपये निधीऊपलब्ध करावा. समाजातील तरुणांना स्वतंत्र रोजगार उपलब्ध करून द्यावा. मेंढपाळ्यांना चराउ कुरणे उपलब्ध करून द्यावी आदिसह विविध मागण्या मांडण्यात आल्या.

या रास्ता रोको आंदोलनात पंचवटी मंडल अध्यक्ष सुनील केदार, महापौर बाळासाहेब सानप, सभागृह नेता मधुकर हिंगमिरे, नगरसेवक प्रा. राजेंद्र नवले, बंडू आव्हाड, शरद सानप, उत्टमराव उगले, गुलाब सय्यद, सौ. भारती बागुल, सौ मंगला कोठूळे, नगरसेवक अरुण पवार, सौ. रंजना भानसी, दिगंबर धुमाळ, अमारेश बैरागी, संतोष लासुरे, बलदेवसिंगचितोडिया, आदिसह भटक्‍या-विमुक्त जातीजमतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रास्ता रोको करणार्‍या ७९ पुरूष व ४८ महिला अशा १२७ भारतीय जनता पक्षाच्या व भटक्‍या-विमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. शांतता कायदा सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com