तर भाजपा पुन्हा सत्तेत येईल!
गांवकरी, ०४ जून २००६
  राजकारनामध्ये जय पराजय येतच राहाणार; परंतु कार्यकर्ता जर खंबीर राहिला, तर दोन खासदार ते केंद्रात पंतप्रधानपदापर्यंत १८/२० वर्षात जाता येते हे सुध्दा भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय अटलजीबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार भाजपा कार्यकर्त्यांनी वाटचाल केल्यास भाजपा पुन्हा सत्तेवर येईल.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेला २८ डिसेंबर २००५ रोजी २५ वर्षे पूर्ण झाली. योगायोग म्हणजे याच दिवशी कॉँग्रेस पक्ष स्थापनेला सुध्दा १२० वर्षे झाली. राष्ट्रीय स्वयसेवक संघाची तत्त्वे व विचारसरणीवर त्यावेळच्या संघ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीच पुढाकार घेऊन एका वेगळ्या विचारसरणीनुसार भाजपाची स्थापना केली. या पक्षांचे पहिले अधिवेशन मुंबई येथे १९८० साली झाले. २५ वर्षांनंतर रोप्यमहोत्सव वर्ष म्हणून पक्ष साजरे करत असताना पुन्हा एकदा मुंबई येथेच पक्ष नेत्यांनी पुढील रणशिंग फुंकले. २५ वर्षाची भाजपाची वाटचाल व इतिहास व १२० वर्षाचा कॉँग्रेस पक्षाचा इतिहास पाहता ज्या दिवशी १९८० साली भाजपा स्थापन झाला त्यावेळेपासून २ खासदार ते केंद्रात पंतप्रधानपदापर्यंत मजल मारणारा भाजपा निश्चितच गरूड भरारी घेत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचबरोबर ज्यावेळी भाजपा स्थापन झाला तेव्हापासून कॉँग्रेस पक्षाची घसरण सुरू झाली. कारण कॉँग्रेसला प्रबळ व योग्य विरोधी पक्ष म्हणून भाजप होऊ शकतो याची सर्वसामान्यांना जाणीव झाली. मुंबई येथे शिवाजी पार्कवर नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत विविध वक्त्यांनी भाषणे व मार्गदर्शन केले. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर यांनी महाराष्ट्राच्या ज्वलंत प्रश्नावर भाषण केले. राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोद महाजन यांनी पक्ष संघटन, पक्षाचा इतिहास व पक्ष बांधनीवर मार्गदर्शन केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांनी देशाची आंतरिक व बाह्या सुरक्षा व केंद्रातील कॉँग्रेस सरकारचे अपयश विषद केले. माजी पंतप्रधान व आजच्या घडीला भाजपाचे सर्वोच्च नेते श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले व संघर्षाकरिता तुमच्या बरोबर राहील; परंतु यापुढे कोणतीही निवडणूक लढवीनार नाही, असे जाहीर केले. अटलजी जरी भारताच्या राजकारणात सक्रिय नसले तरी राष्ट्रीय स्वयसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा महत्वाचा दुवा व कणा तसेच मार्गदर्शक व सल्लागार म्हणून त्यांचे महत्व अनन्यसाधारण राहील हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही. तथापि भारतीय जनता पक्षाची पहिली व दुसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. तिसरी पिढी व कार्यकर्ते, पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून क्षमता नसलेले कार्यकर्तेच इथे मोठे होतात त्यामुळे भाजपा हा पक्ष व्यक्ती केंद्रित पक्ष नसून विचारांवर गुणवत्तेवर आधारित पक्ष आहे हे सिध्द होते. त्यामुळेच पक्षाची वाढ व विस्तार झपाट्याने झाला आहे. पक्षशिस्त, संघटन, विचारधारा व राष्ट्रीय संघाबरोबर असलेली बंधिलकी या तत्त्वावर भाजपा उभा आहे. घर मोठे झाले म्हणजे थोड्या फार कुरबुरी होणारच; परंतु त्याचबरोबर हे सुध्दा महत्वाचे आहे की, राष्ट्रीय स्वयसेवक संघाबरोबर असलेली वैचारिक बांधणी इतकी घट्ट आहे की एखाद्या व्यक्ती केंद्रित आठवा इगो असलेल्या नेत्याने पक्ष सोडून दुसरा पक्ष काढण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होऊ शकला नाही भाजपा उभा राहिला व आहे तोच मुळात विचारधारेवर. त्यामुळे भारताच्या इतिहासात एकमेव भाजपा हाच असा पक्ष आहे की त्या पक्षाचे तुकडे झाले नाही किंवा त्या पक्षामधून बाहेर पडून एखादी व्यक्ती दुसरा पक्ष स्थापन करून यशस्वी होऊ शकली नाही. थोड्या फार प्रमाणात भाजपामध्ये कॉँग्रेस संस्कृती आली. कारण पक्ष मोठा व्हावा म्हणून इतर पक्षातील काही नेते व कार्यकर्ते पक्षते आले. त्यांचे काही गुण आवगुण त्यांच्याबरोबरच पक्षात आले; परंतु त्याचा फार मोठा परिणाम भारतीय जनता पक्षावर होणार नाही. कारण त्यांना जर भाजपात राहायचेच असेल तर त्यांना भाजपाची तत्वे, मूल्ये, पध्दती, अंगिकारावीच लागेल. भारतीय जनता पक्षाची स्थापना, सुरूवात व विस्तार पाहाता शिस्तबध्द पध्दतीने पक्षाची वाटचाल सुरू राहिल्यास भारतीय जनता पक्ष केंद्रात पुन्हा सत्तास्थानी येईल यात तीळमात्र शंका नाही. कारण मागील लोकसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षापेक्षा फक्त ७ खासदार भाजपाचे कमी होते. याचा अर्थ भाजपाचा सपशेल पराभव झाला, असे मुळीच नाही. राजकारनामध्ये जय पराजय, यश अपयश येतच राहाणार; परंतु कार्यकर्ता जर खंबीर राहिला, नाउमेद न होता सतत कार्यरत राहिला तर दोन खासदार ते केंद्रात पंतप्रधानपदापर्यंत १८/२० वर्षात जाता येते हे सुध्दा भाजपा कार्यकर्त्यांनीच दाखवून दिले आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रमाणेच त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार वाटचाल केल्यास भाजपा पुन्हा सत्तेवर येईल.

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com