भाजपाची वाटचाल सत्तासंपादनाचीच
देशदुत ०८-०४-२००५
  भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला ६ एप्रिल रोजी २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांपैकी हा एक पक्ष. भाजपाला जरी २५ वर्ष पूर्ण झाली असली तरी त्यापूर्वी २५ वर्षाचा जनसंघाचा व तीन वर्षाचा जनता पार्टीचा अनुभव या पक्षाच्या गाठीशी आहे. गेल्या २५ वर्षात पक्षाने अनेक चढउतार पहिले. रौप्यमहोत्सवानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांकडून अपेक्षा व्यक्त करणारा हा लेख ६ एप्रिल १९८० हा भारतीय जनता पक्षचा स्थापना दिवस. त्यापूर्वी हा पक्ष भारतीय जनसंघ म्हणून ओळखला जात होता. स्व. पंडित दिनदयाळ उपाध्याय या नेत्यांच्या आदर्श विचारप्रणालीनुसार जनसंघाची वाटचाल सुरू होती. विचारांना राष्ट्रहिताचे अधिष्ठान असेल तर राजकीय भूमिका कधीच चुकणार नाही, या प. दिनदयाळ उपाध्याय यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यावेळी जनसंघाची वाटचाल प्रखर राष्ट्रवादाच्या मुदयावर सुरू होती. आजचा भाजपा म्हणजेच पूर्वीचा भारतीय जनसंघ होय. २५व्या वर्षात पदार्पण करणारा भाजप ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आहे. पुर्वी जनसंघ असतांना जनसंघाचा दिवा घरोघरी लावा. असे कार्यकर्ते म्हणायचे. कारण पूर्वीच्या जनसंघाची निशाणी दिवा (पणती) होती. त्यावेळी विरोधक (कॉँग्रेस) जनसंघ व दिव्याची खिल्ली उडवायचे. त्यावेळी विजय दूरच परंतु उमेदवार मिळणे कठीण जायचे.
आता निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्याना जसा आनंद होतो तसाच आनंद तेव्हा जनसंघाला उमेदवार मिळाल्यानंतर व्हायचा. महाराष्ट्रात त्यावेळी स्व. उत्तमराव पाटील, स्व. रामभाउ म्हाळगी , स्व. रामभाउ गोडबोले, स्व. मोतीराम लाहने यांनी खूप कष्ट करून जनसंघ वाढवला. कॉँग्रेस नेत्या स्व. इंदिरा गांधी यांनी १९७७ साली देशात आणीबाणी जाहीर केली व राष्ट्रीय सेवक संघ, जनसंघ यासह देशभरातील कॉँग्रेस विरोधकांना त्यांनी तुरुंगात टाकले. त्याचीच परिणीती आणीबाणी उठवल्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या कॉँग्रेसचा देशभर पराभव झाला.१९७७ साली स्व. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनसंघासाह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला व नागरधारी शेतकरी निशाणीवर विजय संपादन केला.
तथापि दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्यावर जनता पक्षातील समाजवादी पक्ष व जनसंघात मतभेद झाले. त्याचा परिणाम हा पक्ष फुटण्यात झाला व ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. भाजपाची ध्येय धोरणे, विचारधारा, प्रखर राष्ट्रवाद, सर्वसामान्य जनता, शेतकरी, ग्रामीण भागातील लोकांपर्यंत विकासाची धोरणे राबविणे हे आहे.
कॉँग्रेसला योग्य पर्याय म्हणूनही भाजपाचे नाव त्या वेळी होऊ लागले. याचबरोबर भाजपा एका-एका राज्यात सत्तेत येऊ लागला व अन्य पक्षांचे लोक भाजपात येऊ लागले. आजही योग्य विचारसरणी घेऊन काही लोक, कार्यकर्ते भाजपात येत आहेत. तथापि सत्ता मिळविणे व योग्य राबविणे हे जरी पक्षांचे अंतिम लक्ष्य असले तरी पक्षाची ध्येय-धोरणे पायदळी तुडवीली जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे काम पक्ष वाढत असताना अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांनी प्रकर्षाने घ्यावी लागली २५ वर्षात भाजपचा प्रवास गावपातळीपासून तर थेट देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत झाला. या काळात पक्षात सत्तसंपादनाच्या हेतूने अनेक पक्षांचे नेते व कार्यकर्ते आले. ज्यांना पक्षाची विचारधारा, ध्येय धोरणे आवडली, रुचली, पटली ते थांबले व जे फक्त सत्तासुंदरीकडे पाहून पक्षात आले ते परत बाहेर गेले.
देशाचे पंतप्रधानपद मिळाल्यानंतर अटलजींनी योग्य धोरणे राबवून देशाला गौरव प्राप्त करून दिला. अणुस्फोट चाचणी, कारगिल युध्दात विजय प्राप्त करून भारत स्वयंसिद्ध असल्याचे अटलजिंच्या नेतृत्वाखाली सरकारने दाखवून दिले.
हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे अटलजी व आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली व स्वर्गीय नेत्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार भाजपाची वाटचाल दमदारपणाने सुरू आहे. तथापि या २५ वर्षात सत्ता मिळविताना तडजोडी भूमिकेमुळे काही वेळा पक्षाच्या विचारसरणीला बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे व नेत्यांमुळे थोडे धक्के बसले, परंतु त्याचा यात किंचितही परिणाम पक्षावर झाला नाही. या काळात इतर राष्ट्रीय पक्षांमध्ये फाटाफूट होऊन अनेक वेगवेगळे पक्ष तयार झाले. थोड्या फार प्रमाणात त्यांना राज्य व केंद्र स्तरावर् त्यांना यश आले, तथापि या काळात भाजपातून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन करून राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावर एकही पक्ष यशस्वी होऊ शकला नाही. हेच पक्षाच्या यशाचे गमक आहे. म्हणून पक्षाची ध्येय-धोरणे, विचारप्रणालींना अनुसरुनच कार्यकर्त्यांना रौप्यमहोत्सवी वर्षात पक्षात आणावे. पक्ष प्रवेशानंतरसुध्दा पक्षाचा इतिहास, वाटचाल, शिस्त, विचारधारा, या कार्यकर्त्यांमध्ये रुजवावी, जेणेकरून चांगल्या कार्यकर्त्यांचा शिस्तबध्द पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची प्रतिमा यापुढेही उजळत राहील, हीच या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अपेक्षा.
 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com