लोकनेते गोपीनाथराव मुंडे
गावकरी १२ डिसेंबर २०१५
 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज (ता. १२ डिसेंबेर) ६६ वि जयंती, ३ जून २०१४ हा दिवस उजाडला तोच एका धक्कादायक बातमीने, भाजपा ज्येष्ठ नेते, केंद्रात ज्यांनी ८-१० दिवसांपूर्वीच ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली होती व ज्यांचा ३ जून २०१४ रोजी बीड जिल्ह्यात जंगी सत्कार होणार होता ते गोपीनाथराव मुंडे साहेब दिल्ली येथून बीड येथे येण्याकरिता विमानतळाकडे येत असताना रस्त्यात एक छोटासा पण दुर्दैवी अपघात झाला व काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. मुंडे साहेब आपल्यातून निघून गेले. विश्वास बसत नव्हता; पण स्वीकारण्याखेरीज पर्याय नव्हता. दुपारपर्यंत घरातच अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पुढे काय करायचे असा विचार करत बसलो. जड अंतकरणाने बीडचा रस्ता धरला; कारण दुसर्‍या दिवशी म्हणजे ४ तारखेला मुंडे साहेबांनी जिद्द, चिकाटी, हिंमत व कष्टाने उभ्या केलेल्या वैद्यनाथ साखर कारखाना परिसरात त्यांचा अंतिम विधी पार पडणार होता. अंतर कापले जात नव्हते. पहाटे ३ वा. परळी येथे पोहचलो. तेथे स्मशान शांतता होती. रस्त्याच्या दुतर्फा बंद गाळयांच्या रोडमध्ये, रस्त्यांच्या मधोमध डिव्हायडर, मातीत व जागा मिळेल तेथे लोक झोपले होते, तर काही बसून होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी मुंडे साहेबांचे पार्थिव घरी आणून नंतर वैद्यनाथ कारखान्याच्या प्रांगणात नेण्यात येणार होते; परंतु प्रचंड जनसमुदाय व सुरेक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने पार्थिव घरी नेण्यास नकार दिला व परस्पर ते कारखाना स्थळावर नेण्यात आले. परळी ते वैद्यनाथ कारखाना कार्यस्थळ हा रस्ता गरीब, कष्टकरी स्त्री-पुरूष, तरुण यांनी भरून गेला. सर्वांच्याच चेहर्‍यावर आक्रोश दिसत होता. हॉटेल, दुकाने सर्व बंद असल्याने मुस्लिम बंधावांनी रस्त्यावर पाणी व केळी जागोजागी ट्रक मध्ये भरभरून आणून उभी केली होती. मुंडे साहेबांचे अचानक जाणे सर्वांनाच दु:ख सागारात नेणारे होते. मुंडे साहेबांच्या साहवासातील अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यातील आलेले चढ ऊतर, यश-अपयश, कौटुंबिक वेदना यांचा प्रत्यक्षदर्शी म्हणून माझ्या डोळ्यासमोर अनेक प्रसंग उभे राहीले. विशेषतः एखद्यावर त्यांचा विश्वास बसला की. मग रात्री-अपरात्री फोन करून त्या भागातील खबरबात, माहिती ते फोन करून विचारात. मी व महेश हिरे एकदा राजस्थान येथे १२ जिल्ह्यात प्रचारकरिता गेलो होतो. आम्ही रात्री १ वा. तेथे पोहचलो. आम्हाला ज्या हॉटेल वर जायला सांगितले तेथे गेलो. आम्ही बाहेर पोर्च मधे झोपलो. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोटा येथे मुंडे साहेबांच्या सभेकारिता गेलो. तेथे त्यांच्या बरोबर प्रज्ञाताई मुंडे व पुनमताई महाजन होत्या. ज्यांनी आम्हाला रूम मधे राहण्यास नकार दिला त्यांच्या समोरच मुंडे साहेबांनी प्रज्ञाताई, पुनमताई व सर्वांना माझी ओळख, हा आपला नाशिक चा नातेवाईक, अशी करून दिली. परिणामी त्या नंतर आम्हाला सौजन्यपुर्ण वागणूक मिळाली.

अशाच एका प्रसंगात नाशिक मनपा निवडणुकीत तिकीट कोणाला द्यायचे, असा प्रश्न होता. साहेबांकडे दोन्ही नावे गेली. त्यानाही प्रश्न पडला. साहेबांचा रात्री फोन आला. या दोघांपैकी कोणाला तिकीट द्यावे. मी निवडून येण्याची क्षमता असणार्‍या उमेद्वारचे नाव सांगितले. त्यानी स्पष्टीकरण विचारले व मी ते मुद्देसुद सांगितले त्यांनी त्या उमेद्वार तिकीट दिले व तो उमेद्वार निवडून आला. नाशिक येथील व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचा रस्त्याचा मोबदला नाशिक मनपाकडे अनेक वर्ष प्रलंबित होता. अनेक प्रयत्न करूनही तो मोबदला मिळण्यास यश येत नव्हते. मी संचालक म्हणून २००९ साली निवडून आलो व आम्ही ही कैफियत साहेबांना सांगितली. जो पर्यंत हा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत आपल्या संस्थेची प्रगती होणार नाही, असे सांगितले. मुडे साहेबांनी स्वत: लक्ष घालून ६ महिने पाठपुरावा करून व आम्हाला मार्गदर्शन करून या रस्त्याचा मोबदला ६ कोटी रुपये या शिक्षण संस्थेला मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी या व्ही. एन. नाईक संस्थेला दत्तक घेण्याची घोषणा केली. फक्त यामुळे संस्थेचे ईंजिनेरींग डीग्री व डिप्लोमा कॉलेज, पॉलीटेक्निक, सुसज्ज आइ टी आइ इमारत व जिल्ह्यातील इतर शाखांची विकास कामे झाली यामुळे संस्थेने त्यांच्या पाश्चात इंजिनेरींग कॉलेजला लोकनेते गोपीनाथराव मुंडे कॉलेज, असे नाव देण्याचा ठराव केला.

असेच एकदा नाशिक मध्ये प्रामुख्याने एका समाजावर आघात होईल, अशी घटना घडली. त्यात ज्या व्यक्तीच्या चुकांमुळे घडली त्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढायचा व त्या मोर्चाला मुंडे साहेबांनी यायचे, असा आग्रह नाशिक जिल्ह्यातील समाजधुरिनानी मुंडे साहेब यांच्याकडे केला. रात्री ११.३० वा. मला मुंडे साहेबांचा फोन आला व उद्या मी नाशिकला यावे की नाही हे विचारले. मी आपण येऊ नये असे सांगितले. त्यांनी कारण विचारले. मी ज्यामुळे हे महाभारत घडले, त्यांनी काय चुका, गुन्हे केले ते सांगितले. आपण आल्यास तुमच्या प्रतिमेला तडा जाईल, असे सांगितले. मुंडे साहेबांनी न येण्याचे मान्य केले; परंतु हे सुद्धा सांगितले की, मला ही माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली होती. फक्त माझ्या खात्रीशीर व्यक्तीकडून खात्री करून घ्यायची होती. असे एक ना अनेक प्रसंग डोळ्यासमोरून जात नाही. मी वरळी येथील त्यांच्या कार्यालयात नित्य जात असतो. आताही जातो. फक्त मला गर्दितसुद्धा पाहिल्यावर 'काय केदार काय चाललय,' असे म्हणणारे मुंडे साहेब तेथे नाहीत. आज मुंडे साहेब आपल्यात नाही; पण ज्या धिरोदत्तपणे पंकजाताई परिस्थितीला सामोरे जात आहेत ते पाहता व त्यांच्या कामाची पद्धत पाहता त्या निश्चित लोकनेते मुंडे साहेबांचे कार्य पुढे नेतील. दरवर्षी १२ डिसेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसाला वर्तमानपत्रामध्ये हमखास माझा असलेला लेख यापुढे त्याएवजी जयंतीचा असेल व त्यात भर म्हणून की काय ३ जून या दिवसाचा पुण्यतिथीचा असेल, याचे खूप दु:ख होते

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com