निलेश, तू हे काय केलेस?
गांवकरी, ९ मार्च २००७
  नाशिक शहरात निलेश चव्हाण नावाचे युवा झुंज़ार वादळ काळाच्या पडद्याआड गेले व मन सुन्न झाले. त्यांच्या आत्महत्येमुळे अनेक तर्क वितर्क, शंका, कारने शोधली जाऊ लागली. परंतु निलेश चव्हाण गेले हे अंतिम सत्य स्वीकारणे प्रत्येकालाच अवघड होऊन गेले. पाहता क्षणी मी त्यांच्या प्रेमात पडलो. वयाने, अनुभवाने निलेश लहान, परंतु ते ज्या पद्धतीने आपले विचार मला सांगत होते, पटवून देत होते ते त्यावेळी स्वीकारण्यापलिकडे किंवा त्यांच्या विचारांना होकार देण्यापलिकडे माझ्याकडे काहीच शिल्लक नव्हते. नजरेत तेज, बोलण्यात आत्मविश्‍वास व सामर्थ्य, हसरा चेहरा यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत निलेशची त्वरित मैत्री जमत असे. माझ्याबाबतीत असाच प्रकार घडला. शंतनू देशपांडे, मयूर कपाटे या व इतर व्यावसायिक सहभागिदारांबरोबर दर आठवड्याला होत असलेल्या बैठकीत काही वेळी मी सहभागी होत असे. त्यामुळे आमच्यात विचारांची देवाणघेवाण होई.

कितीही संकटे आली तरी न डगमगनारा निलेश असे काही करेल असे स्वप्नात देखील वाटत नव्हते. आमची शेवटची भेट दि.२५ नोव्हेंबर २०१० रोजी रात्री झाली. उद्या मी संगमनेरला निवडणुकीचा किल्ला लढवायला चाललो आहे. आपण माझ्याबरोबर येणार का? म्हणून मला विचारले. चेष्टा मस्करित त्यांनी मला शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले तर मीही त्यांना हसत भाजपात येण्याचे म्हटले. तेंव्हा क्षणभरही वाटले नव्हते की ५ दिवसानंतर निलेश आमच्यात नसेल. आजच्या अस्थिर राजकारणात स्वतःचे अस्तित्व उभे करणे, समाजाला दाखविणे व टिकवून ठेवणे म्हणजे तारेवरची कसरत. परंतु निलेश या कसरतिच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून पास झाले होते. मग जीवनाच्या लढाईत त्यांना अशी सपशेल हार का पत्करली हेच समजत नाही.

राजकारणात, समाजकारणात इतरही अनेक क्षेत्रांमध्ये प्रत्येकाचा एक संक्रमण काळ असतो, प्रत्येकाची काधीना कधी घुसमट होत असते. तरुण पिढीने, सुशिक्षित व पदवीधरांनी, युवक व युवतींनी राजकारणात यावे असे सर्वच म्हणतात. परंतु निलेश यांच्यासारख्या परिपक्व युवकाचे असे झाले तर आपले काय होईल अशी धास्ती आता वाटू लागली आहे. आयुष्यात न्याय, अन्याय होत असतात. परंतु अनावश्यक अन्याय, मानाची घालमेल व घुसमट जास्त दिवस होत राहिली तर असे प्रकार घडतात. काही प्रश्‍न चर्चेंद्वारे सुटतात तर काही तसेच सोडून देऊन सुटतात. निलेश उत्साही होते. समाजात चांगले बदल त्वरित घडावे असे नेहमी म्हणत. परंतु तसे होत नव्हते. याचे शलय त्यांच्या बोलण्यामधून खदखदत असे. असे का होते? हा प्रश्‍न सतत त्यांना पडत असे. दुसर्‍याची मने सहज जिंकनार्‍या निलेश चव्हाण यांनी स्वतःच्या मनावर नियंत्रण का मिळवले नाही. हा अघोरी विचार मनात येण्यापूर्वी त्यांनी असंख्य मित्रापैकी एकाकडे तरी आपले मन मोकळे केले असते तर..... तर कदाचित असे झाले नसते. परंतु आता या जर-तरच्या गोष्टींना अर्थ नाही. आता पूर्ण विराम. निलेश आपणा सर्वांना सोडून गेला आहे हे सत्य स्वीकारण्याखेरीज आता पर्याय नाही.

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com