ठेवीदार, खातेदारांचे पैसे परत मिळतील?
गांवकरी, २५ मे २००८
  नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात काही सहकारी पतसंस्था व बँका आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. तारण न घेता कर्ज परतफेड, क्षमता न पाहता केलेल कर्जवाटप, संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार व संस्थेच्या निधीचा दुरुपयोग, राजकीय हस्तक्षेप, सहकारामधून बोकाळलेला स्वाहाकार अशा अनेक गैरकार्भारामुळे राज्यात अनेक पतसंस्था व बँका बंद पडलेल्या आहेत. काही सुरू असलेल्या पतसंस्था व बँका ठेवीदाराला मुदत संपल्यानंतर मागताक्षणी ठेव पैसे परत करण्यास असमर्थ ठरल्या आहेत. एन.पी.ए (अनुत्पादक मालमत्ता) तरतुदी लागु झाल्यापासून ज्या पतसंस्था व बँकांनी प्रथमपासून व्यवहार योग्य केलेले आहेत त्यांना कमी अडचणी आल्या. परंतु ज्यांनी प्रत्यक्ष वसूल झालेला नसताना चुकीच्या पध्दतीने नफा दाखविला, त्यांचा खरा मुखवटा एन.पी.ए तरतुदी लागु झाल्यामुळे जनतेसमोर आला. वार्षिक अहवाल व ताळेबांदात काही पतसंस्थाच्या ठेवी कमी व कर्ज वाटपाचा आकडा जास्त दिसत होता. कारण अशा पतसंस्था थकबाकी, कर्जदाराचे कर्ज व व्याज प्रत्यक्ष वसुली झाली नाही तरी कर्जाचे व्याज कर्जखाते नावे टाकून भरघोस नफे वर्षानुवर्षे दाखवत होत्या. परिणामी कर्ज रकमा वाढल्या व ठेवी तेवढ्याच राहिल्या. अशा पतसंस्था व बॅंका बाहेरून सुदृढ दिसत होत्या, परंतु आतून घुशिप्रमाने पोखरलेल्या होत्या. आता तर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रश्नात जातीने लक्ष घातले आहे. कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी सुरुवातीला नाशिक जिल्हा व आता महाराष्ट्रात ठेवीदार संघटनेच्या माध्यमातून अशा अपप्रवृत्तीविरुद्ध लढा उभारला अहे. शासनाने खास . म्हणून मंत्रालयमधून परिपत्रक काढले असून राज्यात अडचणीत आलेल्या पतसंस्था सक्षम पतसंस्थामध्ये विलीनीकरणाचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे ठेवीदारांचा प्रश्न मुळीच सुटणार नाही. याउलट चांगल्या पतसंस्था अडचणीत येतील. याऐवजी राज्यात उत्तम रीतीने काम करत असलेल्या पतसंस्थांना अडचणीत आलेल्या पतसंस्थाचे खालील अटीवर पालकत्व दिल्यास निश्चितच बंद पडलेल्या, तसेच अडचणीत आलेल्या पतसंस्थाच्या ठेवीदार व खातेदरांना दिलासा मिळेल व त्यांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत मिळतील.

नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही ३ वर्षापासून असा उपक्रम करत आहोत. परंतु आता अडचणीत आलेल्या पतसंस्थांची व्याप्ती वाढल्यामुळे त्याकडे जास्त बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. त्याकरिता खालील मुद्दे लक्षात घेऊन काम केल्यास निश्चितच हा प्रश्न सुटेल.
१) अडचणीत येऊन बंद पडलेल्या पतसंस्थेची कर्जदार हा नवीन संस्थेच्या कर्ज योग्य तारण देऊन घेण्यास इच्छुक पाहिजे
२) अडचणीत आलेल्या पतसंस्थेचा ठेवीदार त्या पतसंस्थेत ज्या कर्जदाराचे कर्ज आहे. त्याचे कर्जखाते आपली ठेव रक्कम वर्ग करण्यास तयार पाहिजे.
३) तो ठेवीदार कर्जदारास कर्ज देणार्‍या नवीन पतसंस्थेत ठेव ठेवण्यास तसेच त्या कर्जदारास जामीन राहण्यास तयार पाहिजे.
४) आपली ठेव रक्कम नवीन संस्थेत जामीन राहणार्‍या कर्जदाराच्या कर्जास लिन देण्यास ठेवीदाराची समति पाहिजे.
५) अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या कर्जदाराची पूर्ण रक्कम एकदम भरण्याची ऐपत नसल्यामुळे तसेच त्या ठिकाणी कर्ज वसुली पध्दत योग्य व सक्षम नसल्यामुळे अशा थकबाकी कर्जदारांना व ठेवीदारांना नवीन संस्थेत घेण्यात यावे.
६) नवीन पतसंस्थेत कर्ज देताना त्या कर्जदाराला दरमहा नियमीत हप्ते भरता येतील, अशा पध्दतीने अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज द्यावे.
७) अशा कर्जदाराचे कर्ज हप्ते थकल्यास त्याच्यावर ३ हप्ते थकता क्षणीच कायदेशीर कारवाई करावी.
८) कर्जदाराची जसजशी दरमहा वसुली होईल त्या प्रमाणात तारण ठेवींच्या रकमा ठेवीदारास परत कराव्या.
९) अशा प्रकारे व्यवहार करताना एकतर्फी न करता कर्जदार व ठेवीदार या दोघांचे या विषयावर एकमत झाल्याखेरीज असे व्यवहार करू नये.
अशा प्रकारे आम्ही सक्षम पतसंस्थांमध्ये व्यवहार करत असून यामुळे अडचणीत आलेले ठेवीदार व एकरकमी भरू न शकणारे परंतु दरमहा कुवतीप्रमाणे भरू इच्छिणारे कर्जदार यांना दिलासा मिळत आहे. त्याकरिता सहकार विभाग व या क्षेत्रामधील अभ्यासू मार्गदर्शकांच्या माध्यमातून ठेवीदार व कर्जदारांचे एकत्रित मेळावे घ्यावे. अशा प्रकारे व्यवहार करण्याचे प्रबोधन करून कर्जदार व ठेवीदार दोघांमध्ये विश्वास निर्माण करावा. याप्रमाणे कामाची व्याप्ती वाढविल्यास किमान नाशिक जिल्यात अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या ठेवीदारांना दिलासा मिळेल. कर्जदारांनासुध्दा टप्प्याटप्प्याने परतफेड करण्यास अवधी मिळेल. पुन्हा एकदा विश्वासाचे वातावरण तयार होऊन पतसंस्थावर ठेवीदार व खातेदारांचा विश्वास राहील. अशा प्रकारचे व्यवहार सक्षम पतसंस्थांनी केल्यास त्यांना धोके, तोटे वा काही अडचण येणार नाही. कारण त्यांना ना कर्जदाराला कर्ज रकमेचे त्वरित पूर्ण ठेव रक्कम परत करायची. विचारपूर्वक काटेकोरपणे असे व्यवहार केल्यास त्या पतसंस्थाचे आर्थिक व्यवहार उलाढाल वाढेल. त्यामुळे याबाबतीत संभ्रम निर्माण न करता पुढील पाऊल टाकल्यास योग्य होईल. त्याकरिता बंद पडलेल्या व अडचणीत आलेल्या बँका व पतसंस्थाचे योग्य कर्जदार व ठेवीदार यांना सक्षम पतसंस्थांनी दत्तक घेण्याची योजना राबवावी.

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com